भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी टाकळी-नांदेड मार्गावर लोटला जनसागर 

 वन्नाळी –  भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या दिवशी किमान ४ ते ५ किलोमोटर पर्यंत गाड्या आणि माणसांची गर्दी दिसत होती. टाकळी नांदेड मार्गावर कित्येक किलोमीटरवर पदयात्रेतील वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. काँग्रेस कार्यकर्ते, लहान मुले मोठ्या कुतूहलाने आपल्या पालकांसमवेत यात्रेत सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला पाठींबा देण्यासाठी जनसागर रस्त्यावर उतरला होता.

मंगळवार दिनांक ८ रोजी सकाळी ८.३० वाजता वन्नाळी गुरुद्वारा येथून पदयात्रेला सुरूवात झाली. छोटी मुले, महिला आणि युवा वर्ग मोठया उत्साहात यात्रेत सहभागी झाला होता. वझरगा (अटकळीजवळ) येथे आल्यानंतर साडे नऊ वाजता यात्रेने विश्रांती घेतली. पुन्हा सायंकाळी 4 वाजता खतगाव फाट्यावरून पुन्हा यात्रेला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मोठ्या संख्येने युवा वर्ग या यात्रेत सामील झाला होता. ३० ते ४५ वयोगटातील तरुणांची संख्या जास्त होती. दुपारच्या कडक ऊन्हात रस्त्यावर आणि रस्त्याच्या आजूबाजूला गर्दी पदयात्रेत सामील होण्याची वाट पाहत होती. ४ वाजून १० मिनिटांनी रस्त्यावर मंदगतीने सरकत असलेल्या गर्दीत राहुलजी गांधी यांचे आगमन झाले आणि गर्दीला जिवंतपणा आला. गर्दी नांदेडच्या दिशेने वेगाने सरकू लागली. रस्ता कमी पडू लागला तेव्हा राहुलजी गांधींच्या बरोबर चालण्यासाठी अनेकजण धावाधाव करत होते. टप्याटप्यावर  नफरत छोडो भारत जोडो घोषणा देत पुरुष आणि महिलांचे छोटे मोठे समूह या गर्दीत सामील होत होते आणि गर्दीचे रूपांतर जनसगरात झाले होते. नजर जाईल तिथे पर्यंत लोकांची गर्दी दिसत होती.

खतगाव हायस्कुलचे विद्यार्थी शालेय गणवेशात यात्रेकरूंच्या स्वागतासाठी उभे होते. टाळ्यांच्या कडकडाट करत वेलकम सर… वेलकम सर म्हणत काहीसे झुकून अभिवादन करत होते. त्यापुढे नववारी नेसलेल्या विद्यार्थीनी हातात तुलसी आणि घट घेऊन उभ्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या आणि घोड्यावर बसलेल्या तरुण तरुणींची शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. त्यापुढे हातात विना, टाळ चिपल्यांचा गजरात  जय जय रामकृष्ण हरी गाणारी वारकरी भजनी समुदाय मोठ्या जोशात भजन गात होता.

एका मंचावर महाराष्ट्रातील थोर पुरुष, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अशा थोर पुरुषांच्या वेशभूषेत महाराष्टातील सांस्कृतीचे दर्शन घडवले जात होते.

सुमारे ४५ मिनिटे चालून पदयात्रा भोपळ्याच्या टेकडीला आली तेव्हा यात्रेच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वारांनी लक्ष वेधून घेतले. पदयात्रा जवळ येताच वेगवान घोडेस्वारी करत,  जय भवानी जय शिवाजी असा त्यांनी जयघोष केला. यात्रा पुढे सरकत असताना हे घोडेस्वार  सुद्धा साहसी कसरती करून लक्ष वेधत होते. तर एके ठिकणी सनई डफली आणि ताशाच्या पारंपरिक वाद्यांनी एक वृद्ध वाजंत्री गट सर्वांचे स्वागत करत होता. रस्त्याच्या बाजूला उंचावलेले झेंडे, कटाऊट्स, पोस्टर्स आणि सूर्याच्या प्रतिकृतीमध्ये राहुलजी गांधी यांचे बॅनर्स सर्वत्र दिसत होते.