सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे अभ्यास केंद्र उभारणार! व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाला निर्णय

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे अभ्यास केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय ज्ञान, परंपरा, संस्कृती जोपासणाऱ्या पंढरपूरच्या वारीची किर्ती जगभरात असून यावर अधिक अभ्यास व संशोधन करण्याच्या उद्देशाने विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

याचबरोबर जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अरूण राठोड या खेळाडूच्या संपूर्ण खर्चासाठी अंदाजे दोन लाख रुपये देण्याच्या विषयास देखील यावेळी मान्यता देण्यात आली.

तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. टीचिंग-लर्निंग सेंटर विद्यापीठात सुरू व्हावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव देण्याच्या विषयास यावेळी मंजुरी देण्यात आली. हे प्रस्ताव सिनेटकडून शिफारस होऊन आले होते.

विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखड्यास व्यवस्थापन परिषदेने दुरुस्तीसह मान्यता दिली. आता विद्यापरिषद व त्यानंतर अधिसभेच्या बैठकीत सदरील विषय मांडण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाद्वारे रोजगार देण्यासाठी टीम लीज या कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यास देखील आज मान्यता देण्यात आली. याचबरोबर प्रो रेटा शुल्क वाढवण्याचा विषय व्यवस्थापन परिषदेत होता. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, विद्यार्थी हित केंद्रस्थानी ठेवून, विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे वाढीव शुल्क न घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

या बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. बैठकीचे सदस्य सचिव म्हणून कुलसचिव योगिनी घारे यांनी काम पाहिले.