आम आदमी पार्टीचा खेडमध्ये ‘‘युवा संवाद’’; मयुर दौंडकर यांची माहिती

खेड/प्रतिनिधी – खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील युवकांना आवाहन केले असून, ‘‘युवा संवाद’’ मेळाव्याद्वारे तालुक्यातील प्रमुख प्रश्न आणि उपाययोजना याबाबत विचारमंथन करण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती आप युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष मयुर दौंडकर यांनी दिली.

आम आदमी युवा आघाडीच्या वतीने दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी, मिरा मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता ‘‘ युवा संवाद’’ मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी तालुकाध्यक्ष मयुर दौंडकर यांनी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, राज्य संघटक संदीप सोनवणे, पुणे संयोजक मुकूंद किर्दत आदी उपस्थित राहणार आहेत.

मयूर दौंडकर म्हणाले की, खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील पायाभूत सोयी-सुविधा आणि प्रलंबित प्रकल्प याबाबत युवकांमध्ये अनेक प्रश्न आहेत. तालुक्यातील समस्या आणि त्यावर उपाययोजना याबाबत आम आदमी पार्टीकडून एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, अशी आमची भूमिका आहे. त्याद्वारे प्रलंबित प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात युवकांचा सहभाग लक्षणीय असून, ‘आप’च्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीने काम करणारी युवकांची फळी निर्माण करणे हा आमचा हेतू आहे.

खेड-आळंदीसह जिल्ह्यातील युवकांची हजेरी…

खेड- आळंदी विधानसभा मतदार संघांतर्गत आम आदमी पार्टीच्या पुढाकाराने प्रथमच ‘‘युवा संवाद’’मेळावा होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रदेशस्तरावरील दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे खेड-आळंदीसह जिल्ह्यातील आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ‘युवा संवाद’ला उपस्थिती राहील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी मिरा मंगल कार्यालय, मार्केट यार्ड चाकण येथे जय्यत तयारी करण्यात येत आहे.