‘काय नाटकी माणूस आहे, रश्मी ठाकरेच मुख्यमंत्रीपदी…’, ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा राणेंनी घेतला समाचार

Mumbai: काय नाटकी माणूस आहे, असे म्हणत भाजपा नेते निलेश राणे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. आपण पुन्हा एकदा सत्तेत येऊ आणि राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळवून देऊ, असे लक्षवेधी विधान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. यावर प्रतिक्रिया देताना त्या महिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नीला सोडून इतर कोण असतील, असा टोलाही निलेश राणेंनी लगावला आहे.

वांद्रे येथे लहुजी साळवे यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्राची ताकद एकवटत आहे. मला आनंद आहे. मी बोलू शकतो. रस्त्यावर उतरलो तर काहीही करू शकतो. ही ताकद म्हणजे शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती आहे. शिवशक्ती, भीमशक्ती, लहुशक्ती एकत्र येणार आहे. या तिन्ही शक्तींचा मिळून महाराष्ट्रात आपण मोठी ताकद निर्माण करू शकतो. आपल्या महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी (Women Chief Minister) बसवायची आहे.”

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच माजी खासदार निलेश राणे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. “काय नाटकी माणूस आहे… आता महापौर निवडून आणताना वांदे आहेत, तर मुख्यमंत्री पद सोडून द्या. पण बाजार उठल्यानंतर हे सगळं बोलावं लागतं. दुर्दैवाने कधी सत्ता आलीच तर रश्मीजी ठाकरे ह्याच होणार हे न कळायला कोणी मूर्ख नाही,” अशा शब्दांत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर खरपूस टीका केली आहे.