घरपट्टी वाढवल्याचा मुद्दा तापला; ‘आप’ची भाजपवर घणाघाती टीका

पणजी – भाजप सरकारने फेब्रुवारी 17 रोजी प्रसिद्ध केलेल्या गॅजेटनुसार निवासी आणि व्यावसायिक जागेच्या घरपट्टीत वाढ झाल्याचे आढळून आले असून अधिक पटीने दरांत वाढ केल्याबद्दल भाजप सामन्यांची क्रूर थट्टा करत असल्याची टीका आम आदमी पक्षाने शुक्रवारी केली.

कोविडमुळे लोकांवर विपरित परिणाम होत असताना भाजपचे हे नवे धोरण अमानवीय आहे. हा नवा दर निवडणुकीनंतर लागू केला असून भाजप सरकारने पुन्हा एकदा गोव्याची लूट सुरू केली आहे असे आपचे फोंडा उमेदवार सुरेल तिळवे म्हणाले.

संपूर्ण राज्य कोविड-19 च्या विळख्यात अडकला असून लोक आर्थिकदृष्ट्या त्रस्त आहेत. या परिस्थितीतही लोकांना किराणा, एलपीजी, पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीचा सामना करत आहे. आता सरकारच्या या घरपट्टी दरवाढीमुळे निम्न उत्पन्न गटातील लोकांवर  आर्थिकदृष्ट्या आणखीन भर पडणार आहे, असे तिळवे यांनी सांगितले.

सध्या सरकारने पंचायत क्षेत्रातील घरपट्टीत वाढ लागू केली आहे. याआधी निवासी जागेसाठी प्रति चौरस मीटर ८ रूपये असा कर होता. तो आता ४० रूपये मीटर इतका करण्यात आला आहे. यापूर्वी, व्यावसायिक जागेसाठी 10 रुपये प्रति चौरस मीटर असा शुल्क आकारला जात होता परंतु ते आता 200 रुपये प्रति चौरस मीटर करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यापूर्वी वर्षाला 800 रुपये भरणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला सध्या 100 चौरस मीटरच्या घरासाठी 4000 रुपये मोजावे लागणार आहे. हा सर्वसामान्यांचा क्रूर थट्टा आहे. भाजप सरकार केवळ निवडणूक जवळ येताच सामान्यांचे मुद्दे मांडतो आणि इतर वेळी या प्रकारचे धोरण आणून सामान्यांचे हाल करतो, असे ते पुढे म्हणाले.