भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग, स्वागतासाठी सावरगांव नगरी होतेयं सज्ज

पाटोदा : राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा प्रचंड जनसागराच्या साक्षीने मोठया उत्साहात पार पडत असतो, यंदाच्या या मेळाव्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

येत्या १५ तारखेला दसरा आहे, त्या अनुषंगाने ‘आपला दसरा, आपली परंपरा’ जपण्यासाठी संपूर्ण सावरगांव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका सुरू आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे. मागील चार वर्षांपासून संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव येथे हा दसरा मेळावा होत असून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी संत भगवान बाबा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून परिसराला भगवान भक्तीगड असे नाव दिले आहे.

मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे दसरा मेळावा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला होता. यंदा मात्र कोरोनाचे सावट काही अंशी दूर झाले असून मंदिरे उघडली आहेत, शिवाय सर्व जाहीर कार्यक्रम देखील होत आहेत, त्यामुळे हा मेळावा पुन्हा पहिल्या सारखा पार पडेल अशी दाट शक्यता आहे.

भगवान भक्तीगडावरील १२ एकर परिसरात हा मेळावा होणार असून डागडूजी, परिसराची स्वच्छता आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत भगवान बाबांच्या भव्य मुर्तीच्या खाली असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते, तेही बाहेर काढण्यात आले असून तेथे कायमस्वरूपी पाणी साचणार नाही यासाठी वाॅटरप्रुफ करण्यात येत आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार आहे.

हा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम मानला जातो. मेळाव्याच्या व्यासपीठावर अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात. संत भगवान बाबा आणि लोकनेते मुंडे साहेबांना मानणारा मोठा वर्ग दरवर्षी पंकजा मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. यावर्षी देखील पंकजा मुंडे या संत भगवान बाबांचे दर्शन घेऊन मेळाव्यास संबोधित करणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागून राहिले आहे.

हे देखील पहा