बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडा अन्यथा आम्ही तोडू, राणेंना नवी नोटीस

मुंबई : मुंबई महापालिकेकडून केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांना जुहूतील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केली होती. नारायण राणे यांना ही तिसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे.

नोटीसमुळं नारायण राणे यांना 15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तर, नोटीसला देखील 15 दिवसात उत्तर द्यावं लागणार आहे.

दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई मनपाला केली होती. मात्र, आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप संतोष दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई मनपाने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली. मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार बीएमसीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ही नोटीस पाठवण्यात आली.