दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या आमदार-खासदारांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे – अजित पवार

बारामती: लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या (Worlds Most Populated Country) असलेला देश बनला आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी झाली आहे. आता भारताच्या वाढत्या लोकसंख्येवरुन विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्या आमदार आणि खासदारांना २ पेक्षा जास्त मुले आहेत, त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले पाहिजे, असे विधान अजित पवारांनी (Ajit Pawar) केले आहे.

दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्यांना कोणतीही सवलत देऊ नये, असे सांगून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदार-खासदारांनाही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, असे म्हटले आहे. रविवारी बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले की, लोकसंख्या वाढीच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला पाहिजे.

‘वाढत्या लोकसंख्येसाठी आपणच जबाबदार’
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, माझे आजोबा मला सांगायचे की, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपली लोकसंख्या ३५ कोटी होती आणि आता ती १४२ कोटी झाली आहे, याला आपण सर्व जबाबदार आहोत. दोन दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी सर्वच राजकीय पक्षांनी हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा, असे प्रतिपादन केले आहे.

‘दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना कोणतीही सवलत देऊ नये’
आपल्या देशाच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या, प्रदेशाच्या भल्यासाठी आपण एक-दोन मुले झाल्यावर थांबायला हवे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, यापुढे दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्यांना कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाऊ नये.

‘सवलत दिली नाही तरच लोक याचा विचार करतील’
अजित पवार म्हणाले की, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना तीनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्यांना अपात्र ठरवण्यात यावे, असा निर्णय आम्ही घेतला होता. आम्ही हा निर्णय अत्यंत सावधपणे घेतला होता, पण खासदार-आमदारांच्या बाबतीत असा निर्णय का घेतला जात नाही, असे लोक विचारतात. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की ते आमच्या हातात काही नाही आणि केंद्राने हे काम करावे ही आमची मागणी आहे. दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्या लोकांना सवलत दिली नाही तर ते या समस्येबाबत अधिक जागरूक होतील, असे ते म्हणाले.