गोपीचंद पडळकरांना मंत्री करण्यासाठी कार्यकर्त्याने चक्क रक्ताने लिहिलं पत्र

सांगली – शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा फरकाने जिंकल्यानंतर  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी (Deputy CM Devendra Fadnavis) विराजमान झाले आहेत. दरम्यान, आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.

युतीच्या अनेक आमदारांना मंत्रीपदाची आशा आहे तर  त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील आपला नेता मंत्री व्हावा असं वाटत आहे. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या (BJP MLA Gopichand Padalkar) कार्यकर्त्यांनी तर यासाठी एक आगळा वेगळा प्रकार केलाय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मत्रिमंडळात आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्री पद मिळावे, अशी मागणी आता गोपीचंद पडळकर यांचे कार्येकर्ते करत आहेत, यासाठी सांगली जिल्ह्यातील जत येथील युवा नेते अनिल पाटील (Anil Patil) आणि भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पिरु कोळी (Piru Koli) यांनी चक्क रक्ताने (blood) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र (Letter) लिहिले आहे.

या पत्राची आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाची सध्या जास्त चर्चा आहे. आपल्या लाडक्या नेत्यांना किंवा नेत्यांसाठी अशा प्रकारची पत्रं लिहिण्याचे प्रकार आधीही समोर आलेच आहे. आता पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी असे पत्र लिहिल्याने आता तरी पडळकरांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का ? असा सवाल विचरण्यात येत आहे.