आपले मराठी प्रेक्षकच मराठी गाणी ऐकायला तयार होत नाहीत; मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

युवा मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) ही प्रतिभाशाली गायकही आहे. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या आधीपासूनच तिने बऱ्याचशा कार्यक्रमात गायक म्हणून सहभाग घेतला होता. शाळा, टाइमपास या सिनेमातून प्रकाशझोतात आल्यानंतरही तिने आपला गायनाचा छंद सोडलेला नाही. केतकीने नुकतंच प्रेक्षकांच्या बदललेल्या गाण्याच्या आवडीबद्दल (Ketaki Mategaonkar On Marathi Songs) मत व्यक्त केलं आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये प्रेक्षक मराठी गाणी कमी आणि इतर भाषांमधील गाणी अधिक ऐकू लागले आहेत. यात प्रामुख्याने दाक्षिणात्य गाण्यांना प्रेक्षक डोक्यावर घेतात, असे वक्तव्य करत केतकीने खंत व्यक्त केली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “आपलेच मराठी प्रेक्षक मराठी गाणी ऐकायला तयार होत नाहीत, तर दाक्षिणात्य गाण्याला डोक्यावर घेतलं जातं. प्रेक्षकांनी मराठी गाणी किमान ऐकण्याची तयारी ठेवायला हवी. ‘प्रियकरा…’ गाणं प्रदर्शित झालं तेव्हा हे दाक्षिणात्य कोणतं गाणं आहे? असं मला विचारलं गेलं, तेव्हा मला धक्काच बसला. आपल्याच लोकांना नवी मराठी गाणी माहीत नसतात. त्यांचीही काही जबाबदारी असते.”

“आज प्रसिद्धीची अनेक माध्यमं असूनही त्यात मराठी गाणं मागे पडतंय. मी मराठी गाण्यांबाबत ‘अपडेट’ राहण्याची रसिकांना विनंती करते. तसंच निर्मात्यांबरोबर चित्रपटाच्या सगळ्या टीमनेही गाणी रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंग केलं पाहिजे.” असं केतकीने म्हटले.