अफगाणिस्तानच्या माजी महिला खासदाराची गोळी झाडून हत्या, तालिबान्यांच्या सत्तेनंतरही सोडला नव्हता देश

अफगाणिस्तानच्या माजी महिला खासदार मुर्सल नबीजादा (Mursal Nabizada) यांची गोळी झाडून हत्या करण्यात (Mursal Nabizada Shot Dead) आली. त्यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्डचाही गोळी मारुन खून करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, नबीजादा काबुलमध्ये स्थित त्यांच्या निवासस्थानी असताना रात्री अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा व त्यांच्या बॉडीगार्डचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांचा भाऊही जखमी झाला आहे.

नबीजादा या अमेरिका समर्थित सरकारमध्ये खासदार होत्या. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये घनी सरकारला सत्तेवरुन हटवले होते. तरीही नबीजादा देश सोडून न जाता अफगाणिस्तानमध्येच राहिल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नबीजादा काबुलमध्ये आपल्या घरी होत्या. तेव्हा शनिवारी-रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. काबुल पोलिसचे प्रवक्ता खालिद जारदान यांनी सांगितले की, हल्ल्याच्या वेळी नबीजादा त्यांच्या घरी त्यांच्या बॉडीगार्डसह होत्या. यावेळी अचानक त्यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला आणि यामध्ये नबीजादा यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्डची हत्या करण्यात आली. सुरक्षा दलांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नबीजादांनी देश सोडला नाही
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देश सोडून पळून न जाणाऱ्या नेत्यांमध्ये नबीजादा यांचा समावेश होता. माजी खासदार मरियम सोलेमानखिल यांनी ट्विटरवर लिहिले की, नबीजादा अफगाणिस्तानच्या निडर चॅम्पियन होत्या. त्या एक खऱ्या ट्रेलब्लेझर होत्या, एक खंबीर आणि स्पष्टवक्ता स्त्री होत्या, ज्या धोक्याच्या वेळीही विश्वासासह उभ्या राहिल्या. मरियमच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तान सोडण्याची संधी मिळाली असतानाही नबीजादा यांनी येथे राहून लोकांसाठी लढण्याचा निर्णय घेतला.

नबीजादा कोण होत्या?
नबीजादा 32 वर्षांच्या होत्या. त्या पूर्व प्रांतातील नांगरहार येथील रहिवासी होत्या. नबीजादा 2018 मध्ये काबूलमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. अफगाणिस्तानात अमेरिकन लष्करी वास्तव्यादरम्यान महिला अनेक महत्त्वाच्या पदांवर पोहोचल्या. त्यातील काही न्यायाधीश, पत्रकार आणि राजकारणी बनले. तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अनेक महिलांनी देश सोडून पलायन केले.