ती संधी मिळाली असती तर राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री आजही तुम्हाला दिसला असता – अजित पवार 

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. नेमका कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचं चित्र आहे. दरम्यान,शरद पवार ज्या वैचारिक भूमिकेची मांडणी करत होते ती एवढी कमकुवत आहे का असा सवाल उपस्थित होत असून अजित पवारांचे बंड म्हणजे शरद पवारांचा वैचारिक पराभव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा होता. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाचे मेळावे झाले यात दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपली भूमिका कार्यकर्ते आणि नेत्यांच्या समोर मांडली. यावेळी आपल्या जबरदस्त भाषणात अजित यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहे असे ते म्हणाले. माझ्यावर लहानपणापासूनच साहेबांचे संस्कार झाले असल्याचेही अजित पवार म्हणाले. सत्तेसाठी नाही तर लोकांच्या हितासाठी असा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

2004 ला आपले 71 आणि काँग्रेसचे 69 आमदार आले. त्यावेळी मला मोठं स्थान नव्हतं. सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद द्यावं लागेल. विलासरावांनी विचारलं तुमच्यात कोण होईल? भुजबळसाहेब आर.आर.पाटील प्रमुख नेते म्हणून काम करत होते. माझी त्यावेळी इच्छा नव्हती, कारण हे प्रमुख नेते म्हणून काम करत होते. सगळं आपल्याला मिळालं पाहिजे, असा हव्यास कुणी ठेवू नये. ती संधी मिळाली असती तर राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री आजही तुम्हाला दिसला असता. पण चार खाती जास्त घेतली. असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.