माझ्या दैवताला, विठ्ठलाला आजही विनंती आहे की…; अजित पवारांची शरद पवारांना आशीर्वाद देण्याची विनंती

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अशातच आता दोन्ही गटांनी जाहीर सभा घेत एकमेकांवर तोफ डागली आहे. यावेळी एमईटी कॉलेजमध्ये भाषणाच्या शेवटी शरद पवारांना उद्देशून आम्हाला आशीर्वाद देण्याचे आणि समर्थन देण्याची विनंतीही अजित पवारांनी केली.

माझ्या दैवताला, विठ्ठलाला आजही विनंती आहे की, कुठंतरी थांबायला हवं. एखाद्या गोष्टीचं वय असतं, असे म्हणत आमच्या भूमिकेला समर्थन द्या, मी शेतकरी कुटुंबातील पोरगा आहे, आमच्यात मुलगा २५ वर्षांचा झाली का वडिल शेताची जबाबदारी मुलाकडे देतात. उद्योगपतीही त्यांच्या बाबतीत तसंच करतात, असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय जबाबदारीतून शरद पवारांनी आता मुक्त व्हायला हवं, असे म्हटले.

तसेच, पक्षाच्या कार्यक्रमातून मी जे बोललो त्यात काय चुकीचं होतं, मी सुप्रियालाही सांगितलं होतं, पण सुप्रिया म्हणाली की ते हट्टी आहेत, ते ऐकत नाहीत, असे म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला.

भाषणाच्या शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, ते आपले दैवतच आहे, मी सांष्टांग नमस्कार करुन विनंती करतो. काही आमदारांची ससेहोलपाट होते आहे, इकडे आड-तिकडे विहीर, असं झालंय. आम्हाला आशीर्वाद द्या, असे म्हणत अजित पवारांनी भाषणाच्या शेवटी शरद पवारांना साद घातली.