अजित पवारांच्या शब्दाला आता कोणतीही किंमत राहिली नाही; फडणवीसांचा हल्लाबोल 

मुंबई – राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. आज भाजपची एक बैठक मुंबईत पार पडली.भाजपची बैठक पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्द्यासह इतर मुद्द्यांवरून  (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज विशेषत: महाराष्ट्रातील शेतकरी हवालदील आहे. ज्याप्रकारे वीजेचे कनेक्शन कापण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे. आमच्या लक्षात आलं आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिली नाहीये. मागच्या मागच्या अधिवेशनात अजित पवारांनी पहिल्या दिवशी सांगितलं की, वीज कनेक्शन कापण बंद आणि शेवटच्या दिवशी सांगितलं सुरू. तर मागच्या अधिवेशनात सांगितलं की, त्यावेळी मी चुकीचं बोललो होतो पण आज ठामपणे सांगतो की, शेतकऱ्यांचे वीजेचे कनेक्शन आम्ही कापणार नाही. पण आता जणूकाही स्पर्धा लागली आहे अशा प्रकारे शेतकऱ्याचे वीजेचे कनेक्शन कापले जात आहे. शेतकऱ्याला अक्षरश: आपलं उभं पिक जळताना पहावं लागत आहे. अस्मानी संकट दोन वर्षे आणि आता हे सुल्तानी संकट शेतकऱ्याला झेलावं लागत आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत.नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच.नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील, तर मग हेच म्हणावे लागेल की हे दाऊद इब्राहिमला समर्पित सरकार आहे असं म्हणत फडणविसांनी हल्लाबोल केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, भ्रष्टाचार चरमसीमेला पोहोचला आहे.लिपिक साहेबांना लाच मागतो अन् कंत्राटदारांकडून बचावासाठी काही अधिकारी बंदुकांची मागणी करतात, अशी भयावह स्थिती राज्यात आहे.याचा जाब सरकारला विचारू.देशद्रोह्यांशी संबंध हा सर्वात मोठा गुन्हा आहे.त्यामुळे नवाब मलिक यांचा बचाव करताना नाही जनाची तर किमान मनाची तरी…… तुमच्यासारख्या अहंकाऱ्यांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल. तुम्ही म्हणजे मराठी किंवा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची बारा कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे आणि ती तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.