पुणे तेथे काय उणे! पुण्यात हापूस आंबा आता मिळणार चक्क EMI वर

पुणे- उन्हाळा म्हटलं की फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची ओढ सर्वांनाच लागते. मात्र, हा आंबा खूप महाग असतो. त्यामुळे बहुतांश सर्वसामान्य नागरिकांना हापूस आंबा विकत घेणे परवडत नाही. परंतु पुण्यातील एका हापूस आंबा विक्रेत्याने यावर लय भारी तोडगा शोधून काढला आहे. या विक्रेत्याचा तोडगा ऐकून तुम्हीही ‘पुणे तिथे काय उणे’ या वाक्याचा वापर करण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाही.

पुण्यातील एका हापूस विक्रेत्याने चक्क ईएमआयवर या आंब्याची विक्री सुरू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना हा आंबा घेता यावा यासाठी त्याने ही ईएमआय सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आता हंगामाच्या सुरवातीलाच या सुविधेचा लाभ घेऊन हापूस आंब्याचा स्वाद घेऊ शकणार आहेत.

पुण्यातील गौरव सणस या व्यावसायिकाने आंबा प्रेमीसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गौरव हा सिंहगड रस्ता परिसरात आंबे विक्रीचा व्यवसाय करतो. कोकणातील खास नैसर्गिकरीत्या पिकवलेला देवगड हापूस त्याच्याकडे मिळतो. हापूस आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात सर्वत्र आंबा विक्रीस आला आहे. मात्र, सध्या या आंब्याचे दर हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे हे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याने गौरवने या वर्षापासून हापूस आंबा हा EMI वर विक्री साठी बाजारात आणला आहे. या सुविधेचा लाभ दोन ग्राहकांनी घेतला आहे.

गौरव या बाबत म्हणाला, हापूस आंबा हा महागडा आणि न परवडणारा असतो. अनेक महागड्या गोष्टी नागरिक एका वेळेला पैसे देऊ शकत नसल्याने ईएमआयवर घेत असतात. हीच संकल्पना मी वापरली. देवगड आंब्याचे पेटीचे दर काही हजारात आहे. त्यामुळे हे आंबे देखील ईएमआयवर विकण्याचे मला सुचले. त्यानुसार पेटीएमच्या माध्यमातून ही कल्पना मी प्रत्यक्षात आणली आहे. सध्या नागरिकांनी होम डिलिव्हरी देखील सुरू आहे. हापूस आंबा आता फ्लिपकार्ड आणि अमेजोनवर देखील मिळू लागला आहे.