टीईटी घोटाळा : मी सत्तार यांच्या मुलांवर आरोप करणार नाही मात्र …; अंबादास दानवे यांनी केली चौकशीची मागणी

संभाजीनगर : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा (TET Scam) झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हिना कैसार अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख (Hina Kaisar Abdul Sattar Sheikh and Uzma Nahid Abdul Sattar Sheikh) अशी दोन्ही मुलींची नावे आहेत.अब्दुल सत्तार यांनी याबाबत एक चित्रफीत जाहीर करून हा नाहक बदनाम करण्याचा प्रकार असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली.

दरम्यान, याबाबत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटलं की, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. यात अब्दुल सत्तारांच्याच नव्हे तर अनेकांची नावं नाहीत तर अनेकांची नावं आहेत. यात विरोधकांचं षढयंत्र असण्याचा प्रश्न नाही. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहोत, कुणी दोषी असेल तर त्यांना शिक्षा व्हावी. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, त्यातच हे आढळलं आहे, असंही ते म्हणाले. सत्तारांच्या मुलांचं शिक्षण आहे, त्यांना त्यामुळंच नियुक्ती मिळाली असेल. मी मुलांवर आरोप करणार नाही मात्र या प्रकरणाची चौकशी मात्र व्हायलाच हवी, असंही अंबादास दानवे म्हणाले.

महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात सर्वाधिक गाजलेल्या म्हाडा, आरोग्य आणि टी ई टी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टी ई टी परीक्षेच्या संदर्भात झालेला घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी काही बड्या अधिकाऱ्यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली होती. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्र तपासासाठी ईडीने (ED) पुणे पोलिसांकडून मागून घेतली आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ही सर्व कागदपत्र ईडीच्या ताब्यात सोपवली आहेत.