निंभोरे सारख्या छोट्या खेड्यातील एक मुलगा जेव्हा 1980 साली भारतातील एकमेव मॅग्नेटीक कंपनी उभारतो

माणसांची स्वप्न मोठी असावीत, म्हणजे माणूस कोठच्या कोठे जाऊन पोहचतो, निंभोरे सारख्या छोट्या गावातील एक मुलगा तर 1980 साली अशा जागेवर जाऊन पोहचला आहे जेथे 2021 उजाडले तरी अजून कोणीच पोहचले नाही. ही यशोगाथा आहे भारतातील एकमेव मॅग्नेटीक कंपनीची ज्यांचे सर्वसर्वा आहे अंबरलाल लुणावत.

सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील निंभोरे गावात अंबरलाल यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते. वडिलांना थोडी शेती देखील होती. सहा भावंडे,आई-वडील इतक्या लोकांचा खर्च छोट्या किराणा दुकानांवर भागायचा. अंबरलाल लहानपणी पासूनच अभ्यासत हुशार होते. त्यांना गणित विषय फार आवडायचा 1954 साली त्यांनी निंभोरे सोडले, पुढील शिक्षणासाठी ते जेऊर येथे दाखल झाले, तेथील भारत हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.

दहावी पर्यतचे शिक्षण तेथे पूर्ण केले. दहावीला दणदणीत मार्क्स मिळवत अंबरलाल पहिले आले, पुढील शिक्षणासाठी बार्शीला जाण्याचे ठरविले पण प्रवेश घ्यायला उशीर झाला, त्यामुळे ते वर्ष वाया गेले. पण शांत बसतील ते अंबरलाल कसले त्यांनी त्या एका वर्षात संपूर्ण किराणा दुकानदारी शिकून घेतली. पुढे त्यांनी अकराविला बार्शीला अॅडमिशन घेतले, तेथे देखील त्यांनी पहिला नंबर सोडला नाही.

गणित विषयात अगदी पैकीच्या पैकी मार्क्स ते मिळवत. हे पाहून अंबरलाल यांना एका शिक्षकांनी तू माझ्या गणिताच्या क्लासला ये अशी गळ घातळी. घरची स्थिती अगदी हालाखीची होती, अंबरलाल यांनी त्या शिक्षकांस सांगितले मला तुमच्या क्लासची फी भरने जमणार नाही. त्या शिक्षकांनी त्यांना मोफत शिकवले.अंबरलाल यांनी त्यावर्षी गणितात  200 पैकी 200 मार्क्स मिळवले. पुढे ते पुण्यात आले. त्यांनी इंजिनियरिंगसाठी भारतातील प्रसिद्ध अशा सीईओपी या महाविद्यालयात प्रवेश घेतला.

पहिल्या वर्षी असंख्य अडचणी आल्या. कधी टायफोर्ड तर कधी अपघात तरी देखील पहिलं वर्ष त्यांनी पास केलं. त्यांना मॅटलर्जी हा ट्रेंड मिळाला. पण त्यांना मॅकेनिकल हवा होता. त्यांनी शिक्षकांना विंनती गेली पण काहीच उपयोग झाला. शेवटी एका मित्राने त्यांचा ट्रेड घेतला आणि त्यांना मॅकेनिकल दिला.

1966 साली खूप कष्टाने अंबरलाल मॅकेनिकल इंजिनियर झाले पण तेव्हा देखील फार बेकारी होती. इतक्या उत्तम कॉलेजमधून शिकून देखील त्यांना कोठेच नोकरी मिळाली नाही. शेवटी एका कंपनीत नोकरी मिळाली. तिथे त्यांनी आठ वर्ष काम केले. त्या नंतर त्यांनी भागीदारीत एक व्यवसाय सुरू केला पण तो देखील अनेक कारणामुळे बंद पडला. अंबरलाल यांचा नोकरीचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला पण नोकरी काही मिळाली नाही. त्या नंतर एकच्या सल्ल्याने त्यांनी कन्सल्टिंग व्यवसाय सुरू केला पण तिथे त्यांचे मन लागत नव्हते.

शेवटी 1980 रोजी त्यांनीआर्माटेक असोसिएटस ही मॅग्नेटीक प्रॉडक्ट बनविणारी कंपनी उभी केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज 1600 प्रकारचे मॅग्नेटीक प्रॉडक्ट बनविणारी भारतातील एकमेव कंपनी आहे. देशातील 18 विभागातून त्यांच्याकडे ऑर्डर येतात. 50 हून अधिक कर्मचारी त्यांच्याकडे काम करतात.अंबरलाल यांचा मुलगा अमोल त्यांचा व्यवसाय सांभाळत आहे. त्यांची सून अर्चना लुणावत या देखील सामाजिक कार्यात खूप सक्रिय असतात. अंबरलाल यांचे सामाजिक कार्यातील  योगदान देखील मोठे आहे. समाजाचे आपण देखील काही देणे लागतो ही भावना त्यांच्या मनात नेहमी जागृत असते. अंबरलाल म्हणतात माणूस नवे मार्ग निवडताना थोडा घाबरतो, पण आपण जर तो मार्ग संपूर्ण जोशाने स्वीकारला तर यश नक्कीच मिळते, त्यासाठी प्रयत्न आणि चिकटी आणि प्रयोगशीलता अतिशय महत्वाची आहे.

लेखन- भावना बाटीया संचेती

तुमच्या कडे देखील अशाच काही प्रेरक यशोगाथा असतील तर आझाद मराठी नक्कीच त्यास एक व्यासपीठ देईल.तुमची एक यशोगाथा अनेकांना त्यांच्या स्वप्नाचा मार्ग शोधून देईल, चला तर मग पाठवा  आम्हाला तुमच्या या यशोगाथा आमचा मेल आयडी आहे[email protected]