मुंबई : केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून काही लोकांना बदनाम केले जात आहे. नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर काही गोष्टी मांडल्या आहेत. मीही काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या प्रदिर्घ संसदीय अनुभवामुळे प्रशासनाची मला जाण आहे. सत्तेत आणि विरोधात काम करत असताना प्रशासनाशी आमचा सुसंवाद असतो. सत्तेचा उन्माद आम्ही कधी केला नाही. अस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद म्हणाले आहेत. ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले. याआधी ते विमानतळावर कार्यरत होते, तिथल्याही काही कथा माझ्यावर कानावर आल्या. मात्र त्यावर मी आताच भाष्य करु इच्छित नाही. एनसीबीने गेल्या काही वर्षात जप्त केलेले अंमली पदार्थाची क्वाटिंटी अतिशय कमी आहे. याउलट महाराष्ट्राच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कितीतरी अधिक पटीने अंमली पदार्थ जप्त केले आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा फक्त केंद्राला माहिती देण्यापुरती काही जप्तीची कारवाई करते की काय? अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली.
तसेच गोसावी नामक एका व्यक्तीला पंच म्हणून एनसीबीने घेतले आहे. प्रशासनाने केलेली कारवाई योग्य आहे, हे दाखविण्यासाठी चांगल्या कॅरेक्टरची माणसे पंच म्हणून घेतले जातात. पंच म्हणून घेतलेला व्यक्ती फरार आहे. याचा अर्थ या पंचाची इंटेग्रिटी संशयास्पद आहे. याच्यापेक्षाही गंभीर गोष्ट म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीची पंच म्हणून निवड केली त्या अधिकाऱ्यांचे संबंध कुठल्या वर्तुळाशी आहेत, हे दिसून आले. आता एखाद्या यंत्रणेवर आरोप केल्यानंतर संबंधित यंत्रणा बाजू मांडण्यासाठी पुढे येत असेल तर ठिक आहे. पण भाजपच सर्वात पुढे येऊन बाजू मांडताना दिसते. हे सर्वांसाठीच नवीन आहे. एखाद्या यंत्रणेकडून गैरवापर होत असेल तर त्यांची बाजू मांडण्यासाठी भाजपचे लोक पुढे येत आहेत, ही गंभीर बाब आहे असेही शरद पवार म्हणाले.