राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करु नका; अमित शहांचे भाजप कार्यकर्त्यांना निर्देश

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल अशी घोषणा भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केली आहे. मुंबईच्या दौऱ्यावर असणाऱ्या शाह यांनी कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख करत त्यांनी आपल्याला धोका दिला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली असं सांगतानाच मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्याचा आरोप शाह यांनी केला.

अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर जवळपास 200 पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले,  कानाखाली मारली तर ती शरीराला लागते. मात्र आपल्या घरासमोर कानाखाली मारली, तर तिचा आवाज अंर्तमनापर्यंत जाते. आज ती वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंनी धोका दिला हे बोलण्यात संकोच नको. राजकारणात धोका दिलेल्यांचे राजकारण यशस्वी होत नाही, असेही अमित शाह म्हणाले.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकानंतर भाजपला धोका दिला. राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करु नका. उद्धव ठाकरेंना जमीन दाखविण्याची वेळ आली आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

अमित शाह म्हणाले की, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.