इंदुरीकर महाराजांवर गावकरी संतापले; गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी

बीड : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेत येण्याचे कारण देखील वेगळे असून या प्रकरणी महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी नेकनूरमध्ये करण्यात आली आहे. कीर्तनकार इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नेकनूर पोलीस ठाण्यात नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कळसंबर गाव येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. मात्र अचानक महाराजांनी कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश दिल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप पहायला मिळत आहे. गावकऱ्यांनी महाराजांच्या कार्यक्रमासाठी एक ते दीड लाख खर्च केला होता. यामुळे महाराजांनी अचानक कार्यक्रम रद्द केल्यामुळे महाराजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कळसंबर गावातील नागरिकांनी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.

जर तुम्हाला बरे नसेल, पित्ताचा त्रास होत असेल तर आम्ही तुम्हाला दवाखान्यात नेतो. मात्र दिलेला शब्द मोडू नका. आमची फसवणूक करू नका. गावातील लोकांनी २-२ रुपये गोळा करून रक्कम जमा केलेली होती. असे फसवणे बरे नाही. निदान तुम्ही लोकांना फसवू तरी नका. जर तुम्ही आम्हांला फसवून इतर ठिकाणी कीर्तन केले तर तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी आमची आहे, असे गावकरी म्हणाले.