अनिल देशमुखांना जामीन मंजूर; मात्र CBI च्या भूमिकेमुळे निर्णयाला १० दिवसांची स्थगिती

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी (दि. १२ डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपात जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर ७४ वर्षीय अनिल देशमुख नोव्हेंबर २०२१पासून तुरुंगात होते. यावर्षी एप्रिलमध्ये त्यांना सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी असून ते मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात होते.

दरम्यान, उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सीबीआयने या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं न्यायालयाला सांगितलं. यासाठी १० दिवसांचा स्थगिती या निर्णयावर द्यावी अशी मागणी सीबीआयने केली. न्यायालयाने हे म्हणणं ऐकून घेत या निर्णयाला स्थगिती दिली असल्याने जामीन मंजूर झाला असला तरी देशमुख यांना तुरुंगातून मुक्त केलं जाणार नाही.

अनिल देशमुख यांच्या वकिलांनी यासंदर्भातील माहिती दिली. सीबीआयच्या मागणीनुसार जामीन मंजूर झाल्याच्या निर्णयाला १० दिवसांची स्थगिती निर्णयाला देण्यात आली असली तरी सर्वोच्च न्यायालयामध्येही उच्च न्यायालयाचा निकाल कायम राहील असा विश्वास व्यक्त केला