अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही चूक होती – संजय राऊत 

नागपूर : केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजपाकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाया करण्यात येत असल्याची वारंवार टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. यातच अनेक गंभीर आरोप असणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना ईडीनेअटक केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांप्रमाणेच नवाब मलिक यांचा देखील राजीनामा घेण्याची मागणी भाजपाकडून केली जात असताना संजय राऊतांनी त्यावर आपली भूमिका मांडली आहे.

नवाब मलीक यांचा राजीनामा घेणार नाही. अनिल देशमुख (anil deshmukh) यांचा राजीनामा घेणं ही चूक होती. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाई घाईत झाला. थोडं संयमाने घ्यायला हवं होत, असं संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख यांच्याबाबत काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिलं. अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयने (cbi) 22, ईडीने 50च्यावर, आयकर विभागाने 40 धाडी घातल्या. एका माणसावर इतक्या धाडी घालून कोणता विक्रम प्रस्थापित केला? असा सवालही राऊत यांनी केला.

देशमुख यांचा राजीनामा घेण्यासाठी शरद पवार दबावात होते का? या प्रश्नाला मला असं वाटत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. तसेच संपूर्ण देशात सूडाचं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सूडाचं राजकारण सुरू आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या तख्तापुढे झुकले नाहीत. महाराष्ट्रही दिल्लीपुढे वाकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.