APMC Election : पंकजा मुंडे यांना धक्का देत धनंजय मुंडे यांनी मारली बाजी; परळी, अंबाजोगाईचा निकाल काय?

Bajar Samiti Election Result  : येत्या जिल्हा परिषद निवडणुकींची ‘ट्रायल रन’ ठरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कुठे प्रस्थापितांना धक्का, तर कुठे नवख्यांना संधी, असे चित्र आहे. मतदारांनी नेत्यांच्या मागे जाण्यापेक्षा जे खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या योग्यतेचे उमेदवार आहेत, अशांनाच संधी दिल्याचे निकालानंतर दिसत आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली असली तरीही भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलं होतं ते बीडकडे. परळी आणि अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत अंबाजोगाई बाजार समितीत 18 पैकी 15 जागांवर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपले उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचा हा सर्वात मोठा विजय आहे. 15 जागा जिंकून धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली आहे. तर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना अवघ्या तीनच जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, परळी बाजार समितीत धनंजय मुंडे यांचे 14 उमेदवार आघाडीवर आहेत. तर पंकजा मुंडे यांचा एकच उमदेवार आघाडीवर आहे.

दरम्यान,  अहमदनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला 18 पैकी 18 जागेवर विजय मिळाला आहे. 2 जागा बिनविरोध झाल्या होत्या तर 16 जागेवर आजच्या निकालात भाजपला विजय  मिळाला.