देवेंद्र फडणवीस कोणासोबत आहेत हे तरी कुठे कळतंय? राज ठाकरेंनी अमृता फडणवीसांची बोलती केली बंद

Mumbai: मुंबईत बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना काही खोचक प्रश्न विचारले. सध्याच्या राजकारणात एकमेकांना टाळ्या देण्याचं आणि डोळे मारण्याचे प्रमाण वाढले आहे. तुम्हीदेखील कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ दिसता, कधी बाळासाहेबांच्या शिवसेनेजवळ दिसता, तर कधी भाजपला टाळी देता. मग तुम्ही नक्की कोणासोबत आहात, असा बोचरा प्रश्न अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना विचारला.

राज ठाकरेंनीही आपल्या खास शैलीत अमृता फडणवीस यांना या प्रश्नाचे उत्तर दिले. आता तुम्ही देवेंद्रजींच्या पत्नी म्हणून इथे बोलत नाही आहातच म्हणून काही गोष्टी बोलूनच टाकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही सध्या कोणासोबत आहेत हेच कळत नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना उत्तर दिले.