आशिया चषकाची तारिख ठरली, पाकिस्तानात होणार फक्त ४ सामने; वाचा सविस्तर

Asia Cup 2023: क्रिकेटप्रेमींसाठी अखेर आनंदाची बातमी पुढे आली आहे. बऱ्याच वादानंतर अखेर आशिया चषक 2023 ची तारीख आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेचे दोन यजमान राष्ट्र म्हणून पाकिस्तान आणि श्रीलंका यांची पुष्टी केली आहे. 13 सामन्यांपैकी चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर उर्वरित सामने श्रीलंकेमध्ये खेळवले जातील.

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ यांच्यात एकूण 13 वन डे सामने होणार आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी केली जाणार आहे आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 4 मध्ये खेळतील आणि त्यातून फायनलचे दोन संघ ठरतील.

PTI ने काही दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानात चार सामने होतील. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे पहिल्या टप्प्यात पाकिस्तानात खेळतील, नंतर दुसऱ्या टप्प्यात श्रीलंकेत भारताविरुद्ध सामन्यांसाठी येतील. श्रीलंकेतच फायनल खेळवण्यात येणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या वादामुळे पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्काराची भाषा केली होती.