किशोर आवारे प्रकरणात नवा ट्विस्ट; बापाला मारल्याचा मुलाने सूड घेतला? 

पुणे : मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे (Kishore Aware) यांची नुकतीच दिवसाढवळ्या हत्या (Murder of Kishore Aware) करण्यात आली. तळेगावात अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून फरार झाले. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे.

सुरुवातीला या प्रकरणी आता मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . (A case has been registered against NCP MLA Sunil Shelke in the murder of Kishore Aware). मयत किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे (वय ६९, तळेगाव) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आमदार सुनील शेळके, भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र आता या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आवारे यांनी सर्वांसमोर कानाखाली लगावल्याने त्याचा बदला घेण्यासाठी माजी नगरसेवकाच्या मुलाने आवारे यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

tv9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार,  नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आलेलं आहे. अटकेतील आरोपींनीच हत्येमागचं कारण सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. म्हणून गौरव खळदेला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली आहे.