चांद्रयान मोहिमेचे श्रेय नेहरूंना देण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांचा आटापिटा

Chandrayaan 3 Landing – भारताने अ अंतराळात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेलं हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वतःचा झेंडा फडकवणारा भारत हा जगातला पहिलाच देश आहे.

दरम्यान, एका बाजूला अवघे जग या मोहिमेबाबत भारताचे कौतुक करत असताना नेते मंडळी मात्र श्रेयवादात अडकले आहे. चांद्रयान मोहीमेचे श्रेय हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना देण्यासाठी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांनी आटापिटा सुरु केला आहे. खरतर या मोहिमेसाठी केवळ शास्त्रज्ञांचे कौतुक करणे अपेक्षित असताना नेते मंडळींना श्रेय देण्यात दोन्ही बाजूचे पुढारी व्यस्त असल्याचे चित्र आहे. भाजपचे देखील काही नेते या मोहिमेचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना देत आहेत.

केवळ नेहरू किंवा मोदींचे नव्हे तर हे श्रेय संपूर्ण भारताचे आहे असे देखील मानणारा एक वर्ग आहे. मात्र  दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याची सुरुवात केल्यानंतर आता कॉंग्रेस नेत्यांनी देखील त्याच मार्गाचे अनुकरण करायला सुरुवात केली आहे.

आजचे यश हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीचा पुरावा आहे. पंडित नेहरुजींनी विज्ञानाला महत्व देत देशाच्या विकासावर भर दिला म्हणूनच भारत चांद्रयानची ऐतिहासिक कामगिरी करु शकला. असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

तर दुसऱ्या बाजूला याबाबत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सुरू झालेल्या अंतराळ संशोधनाच्या मोहिमेतील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. संपूर्ण देश वासियांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद या शास्त्रज्ञांसोबत होते. आजवर देशाच्या विविध पंतप्रधानांनी दूरदृष्टी दाखवत या मोहिमेला आकार दिला, त्या सर्वांचे या निमित्ताने ऋण व्यक्त करायला हवे.