Chandrayaan 3 Landing : नेहरुंनी वैज्ञानिकांना प्रोत्साहित केलं त्या सगळ्या प्रयत्नांचे चीज झालं  – शरद पवार 

Chandrayaan 3 Landing – भारताने आज एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेलं हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वतःचा झेंडा फडकवणारा भारत हा जगातला पहिलाच देश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील नेहरु सेंटर येथून चांद्रयान ३ च्या लँडिगचं प्रक्षेपण पाहिलं. चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पणे सॉफ्ट लँड झाल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाली हे इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं असून त्यांच्या श्रमामुळं हे साध्य झाल्याचं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करताना, कधी यश येत, कधी अपयश येतं. पण यश मिळालं म्हणून या देशाच्या वैज्ञानिकांनी त्यांचे पाय जमिनीवरुन हालवले नाहीत आणि अपयश आलं म्हणून ते कधी नाऊमेद झालेले नाहीत, असं म्हटलं. या त्यांच्या अखंड कष्टातून चांद्रयान ३ मिशनच्या माध्यमातून भारतानं जगाला दाखवलं की आमचे वैज्ञानिक जगाला पुढं नेण्यासाठी शक्तीशाली आहेत, असं शरद पवार म्हणाले. आज आणखी एका गोष्टीचा आनंद आहे. मला याची माहिती घेण्याची संधी नेहरु सेंटरमध्ये मिळाली. जवाहरलाल नेहरु यांनी विज्ञान तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत केलं. त्यांनी या नेहरु सेंटरची स्थापना केली होती. नेहरुंनी वैज्ञानिकांना प्रोत्साहित केलं त्या सगळ्या प्रयत्नांचे चीज झालं असं पाहायला मिळालं. चांद्रयान ३ चं यश भारताची इज्जत जगात वाढवण्यात महत्त्वाचं ठरेल, असं शरद पवार म्हणाले.

जवाहरलाल नेहरु यांनी नेहरु सेंटर असेल, इस्त्रो असेल त्याची पायाभरणी केली होती, त्याचा फायदा आज आपण पाहत आहोत. मी इस्त्रोच्या संशोधकांचं अभिनंदन करतो, असं शरद पवार म्हणाले. कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलिही राजकीय नीती याचं या ठिकाणी महत्त्व नाही. इस्त्रो आणि या देशाच्या वैज्ञानिकांना कष्ट आहे. श्रेय द्यायचं असेल तर श्रेय द्यावं लागेल, असं शरद पवार म्हणाले.