औरंगजेब हा वाईट राजा नव्हता, तो चांगला मुसलमान होता; अबू आझमी पुन्हा बरळले

मुंबई  – औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराबाबत महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी विरोध केला आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणावरून राजकीय वातावरण तापत असतानाच अबू आझमी यांनी त्याविषयी विधान केलं आहे. ‘औरंगजेब हा वाईट व्यक्ती नव्हता’, असं विधान अबू आझमी यांनी केलं आहे.

काय म्हणाले अबू आझमी?

‘औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे. त्यामुळे तुम्ही राम पुनियानी यांना भेटा, ते मुस्लीम नाहीत. पण त्यांना औरंगजेबबाबत विचारा, औरंगजेब चांगला मुसलमान होता, याची हजारो उदाहरणं त्यांच्याकडे आहेत. औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही’, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.

36 जिल्ह्यांत तीन नावे उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद अशी मुस्लिम आहेत. या तीन जिल्ह्यांची नावे बदलल्याने कोणाला नोकरी मिळणार नाही, महागाई कमी होत नाही. जिल्ह्यांची नावे बदलून तरुणांना नोकरी मिळत असेल तर नाव बदलल्याचे स्वागत करेन असे आझमी यांनी म्हटले होते.