..म्हणून औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले, तो हिंदुद्वेष्टा नव्हता; भालचंद्र नेमाडेंचे वादग्रस्त वक्तव्य

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. औरंगजेबावरुन (Aurangzeb) राजकारण तापल्यानंतर आता प्रसिद्ध लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता असा दावा केला आहे. ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया’तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तरी रौप्य महोत्सवी सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.

साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, पुस्तके वाचली की, तुम्हाला खरे काय ते कळेल. बाहेर चाललेले खोटे असते. शिवाजी महाराजांचा विश्वासू सहकारी मुसलमान होता. शेवटपर्यंत त्यांचा विश्वास असणारा सहकारी मदारी मेहेतर होता. औरंगजेबाचा सेनापती जयसिंह ज्याने शिवाजी महाराजांना पकडून दिले तो हिंदू होता.

औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले होते. निम्म्याहून जास्त हिंदू सरदार त्याच्या काळात वाढले; मग, तो हिंदूद्वेष्टा वगैरे होता, असे कसे म्हणता येईल? सतीप्रथा कुणी बंद केली हे विचारले की, उत्तर येते लॉर्ड बेटिंग. मात्र, सतीची प्रथा पहिल्यांदा बंद करणारा औरंगजेबच होता, असेही नेमाडे यांनी सांगितले.

औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या. शाहजहानची आई हिंदू होती, अकबराची बायको हिंदू होती, औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या परत आल्याच नाहीत. औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आले. म्हणून त्याने काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले. औरंगजेबाला इतिहासकारांनी हिंदूद्वेष्टा ठरवले आहे. पण, औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता, असे वादग्रस्त वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केले आहे.