कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी होत असताना बाबर आझमचे झुंजार शतक, टीकाकारांची बोलती बंद!

PAKvsNZ: कराची (Karachi Test) येथे सुरू असलेला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी सामना रोमांचक स्थितीत आहे. सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानची फलंदाजी फळी गटांगळ्या खाताना दिसली. मात्र कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) यांनी समंजस खेळ दाखवत संघाला चांगल्या स्थितीत आणले आहे. आझमने तर कर्णधार खेळी दाखवत झुंजार शतक झळकावले आहे. यानंतर सोशल मीडियावर आझमच्या शतकाची जोरदार चर्चा सुरू असून त्याच्या स्तुतीसुमनांची उधळण होत आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम प्रचंड दबावाखाली होता. नुकतेच पाकिस्तान संघाने घरच्या मैदानावर सलग चार कसोटी सामने गमावले आहेत. त्यामुळे बाबरला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणीही जोर धरू लागली होती. अशातच आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. आपल्या कर्णधारपदामुळे सतत टीकेला सामोरे जावे लागत असलेल्या बाबर आझमने शतक (Babar Azam Century) झळकावत संघाला संकटातून बाहेर काढले आहे. तसेच टीकाकारांची तोंडेही बंद केली आहेत.

बाबर आझमचे कसोटी क्रिकेटमधील हे 9वे शतक आहे. त्याने पाकिस्तानच्या डावाच्या 53व्या षटकात एका मजबूत चेंडूवर षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. न्यूझीलंडविरुद्धचे हे त्याचे दुसरे कसोटी शतक आहे. त्याने 161 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार ठोकत शतक झळकावले. 2022 मधील त्याचे हे चौथे शतक आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध कसोटीत शतके झळकावली आहेत.