भारतीय क्रिकेटर सचिन तेंडूलकरच्या घराबाहेर बच्चू कडूंचे आंदोलन, पण कारण काय?

Bachchu Kadu Protest: प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले आहेत. बच्चू कडू आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन सुरू केले आहे. बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकरकडे (Sachin Tendulkar) भारतरत्न पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे. यासाठी ३० ऑगस्टपर्यंतची मुदत त्यांनी दिली होती. मात्र, तोपर्यंत सचिन तेंडुलकरकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे आता बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडूलकरने केलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या जाहीरातीवर बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला होता. एक तर सचिनने ऑनलाईन गेमिंगच्या जाहीराती (Sachin Tendulkar Online Gaming Ad) सोडाव्यात, नाहीतर त्याने त्याला मिळालेला भारतरत्न पुरस्कार परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. ऑनलाईनच्या गेमिंगच्या या जाहीरातीमुळे सचिनला मानणाऱ्या तरुणाईवर वाईट परिणाम होत असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे होते. परंतु बच्चू कडूंना सचिन तेंडूलकरकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने आज स्वत: बच्चू कडू आणि प्रहारचे कार्यकर्ते सचिनच्या घराबाहेर जमले आहेत.

पोलिसांनी मध्यस्थी करत बच्चू कडू व काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.