शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत वारकऱ्यांकडुन टोल वसुली; 4 जणांवर गुन्हा दाखल 

पुणे –   आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांकडून टोल आकारणी केल्याप्रकरणी पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) पाटस येथील टोल प्लाझाचे व्यवस्थापकीय अधिकारी अजयसिंग ठाकुर, आणि इतर तीन जणांवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दि. ०७/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र शासनाने आषाढी वारी करीता जाणारे सर्व भाविक तसेच वारकरी यांच्या वाहनाना टोलमाफी केल्याबाबतचे परीपत्रक पारीत करण्यात आले होते. त्याबाबतच्या सुचना लेखी व प्रत्यक्ष स्वरूपात यवत पोलीसांनी पाटस टोलनाका येथील अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या होत्या.

चार जणांवर गुन्हा दाखल

यानंतर देखील पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील  टोल नाक्यावर काही वारकऱ्यांना टोल माफ न करता , टोल वसुली करण्यात आली . टोल नाका प्रशासनाने महाराष्ट्र  शासनाच्या (Government of Maharashtra)आदेशाचा भंग केल्याचे निष्पण झाल्यानंतर यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी  स्वतः  पाटस टोलनाक्याचे अधीकारी अजयसिंग ठाकुर,सुनिल थोरात व शिप्टइंचार्ज विकास दिवेकर , टोल कर्मचारी बालाजी वाघमोडे यांच्या विरूदध यवत पोलीस स्टेशन येथे  गु.र.नं ५५५/२०२२ भा.द.वि.क. १८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला  आहे .सदर गुन्हयाचा तपास दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , यवत पोलीस  स्टेशन चे पोलीस निरीक्षक  नारायण पवार यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे  हे करीत आहेत.