रावसाहेब दानवे हे राज ठाकरे यांचे प्रवक्ते केव्हापासून झाले ? राष्ट्रवादीचा सवाल

मुंबई – केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Central Minister Raosaheb Danve) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांचे प्रवक्ते कधीपासून झाले असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद (Aurangabad) येथे होणाऱ्या सभेबाबत पोलिसांनी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना सूचना करून ईदनंतर ही सभा घ्यावी असे कळविले असतानाच केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांची सभा एक तारखेला होणारच असं वक्तव्य करून स्वतःचंच हसं करून घेतले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राज ठाकरे यांची सभा व्हावी आणि त्यातून राज्यातले सामाजिक वातावरण बिघडावे ही भाजपची रणनीती (BJP’s strategy) आता उघड झाली आहे. राज ठाकरे हे भाजपाची ‘सी’ टीम (C Team) आहे हे आम्ही पहिलेच ओळखलं होते आणि आता केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यानंतर यावर शिक्कामोर्तब देखील झाला आहे अशी टीका महेश तपासे यांनी केली.

महाराष्ट्राची सामाजिक व्यवस्था बिघडावी व त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा हा एक कलमी कार्यक्रम घेऊन राणा दांपत्य यांनी मातोश्रीला (Matoshree) जाण्याचा चंग बांधला. त्यांच्या या कृतीला भाजपाचे समर्थन होते हे आता महाराष्ट्रातल्या जनतेपासून लपलेले नाही असेही महेश तपासे म्हणाले.

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार (MVA) स्थापन झाले व त्यानंतर होणाऱ्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळत राहिले. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी आता नवीन युक्ती केली पाहिजे यासाठी चिंतन नागपूर व दिल्ली येथे झाले असावे व त्यातून भाजपने आपली राजकीय रणनीती बदलून धार्मिक तेढ, कायदा व सुव्यवस्था (Law And Order)  बिघडवणारी परिस्थिती निर्माण करून सरकारला घेरण्यासाठी काही जबाबदारी राज ठाकरे व राणा दांपत्य यांच्यावर सोपविण्यात आली असा संशय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे अशी शंका महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.