भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांना धोबीपछाड दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – संजय राऊत

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने (bjp) पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपच्याच नेत्यांना उमेदवारी दिल्याने मित्रपक्षांनी भाजपवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांनी तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटून जाहीर नाराजीही व्यक्त केली. या सर्व घडामोडी घडत असताना आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारीला भाजपने समर्थन दिले आहे.

आधीच पाचव्या उमेदवाराला मते कमी पडत असताना भाजपने सदाभाऊ खोत यांना निवडणूक मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर खोत यांनीही आज अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

दरम्यान, याबाबत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) म्हणाले, भाजपने त्यांचा पाचवा उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरवला आहे व राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेची सोपी निवडणूक कठीण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अहंकार व पैशांच्या अतिरेकी बुस्टर डोसचे हे अजीर्ण आहे. महाराष्ट्रात काहीच सुरळीत घडू द्यायचे नाही असेच त्यांचे प्रयत्न आहेत . सुरळीत चाललेले त्यांना पाहवत नाही . अर्थात महाविकास आघाडीचे नेतृत्वही काही लेचेपेचे नाही व भाजपचे पेच – डावपेच त्यांच्यावरच उलटविल्याशिवाय ते राहणार नाहीत. राज्यसभा व नंतरच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांना धोबीपछाड (Laundress) दिल्याशिवाय ‘ ठाकरे सरकार ’ (Thackeray government) स्वस्थ बसणार नाही . घोडा मैदान लांब नाही ! असं राऊत यांनी म्हटले आहे.