प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला अक्कल लागत नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबई महापालिका नागरिकांना सर्वाधिक सुविधा देत असते. पण जरा कुठं खुट्टं झालं की लगेच महापालिकेला दुषणं दिली जातात. महापालिका काय करते? असा सवाल केला जातो. प्रश्नांचा भडिमार केला जातो. प्रश्न विचारा. प्रश्न विचारणं सोपं असतं. त्याला अक्कल लागत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आलं. दृश्यप्रणालीद्वारे पार पडलेल्या या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की,  सरकारी कामाबाबत अशी कायम चर्चा असते की, तिळगुळ द्यावा लागतो. परंतु या कामाबाबत तसं काही झालेलं नाही. आता यानिमित्ताने छोटी छोटी कामे पूर्ण होणार आहेत.

आजचा कार्यक्रम हा क्रांतिकारक कार्यक्रम आहे. देशातील एकमेव महापालिका आहे, जिने अशाप्रकारे उपक्रम सुरू केला आहे. व्हॉट्स अॅपचा उपयोग आणि दूरपयोग यातील फरक जाणून घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारा आहे.

अनेकजण असे आहेत की, कामं करतात परंतु दाखवत नाहीत. मग प्रश्न निर्माण होतो ‘जंगल में मोर नाचा किसने देखा’ कौतुक करावं किंवा ते किती होईल म्हणून आपण काम करत नाही. चांगल्या कामांची दखल घेतली जात नाही. परंतु थोडी चूक झाली की, महापालिकेला टार्गेट केलं जातं. परंतु आता महापालिका नेमकं काय काम करते? हे आता सर्वांना कळणार आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.