भाजपा राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे – नाना पटोले 

मुंबई – महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ ( MVA ) सरकार खपवून घेणार नाही. राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी जर कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावरही कारवाई करतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Maharashtra Pradesh Congress Committee President Nana Patole ) यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, कोणाच्याही धर्माबद्दल थेट टीका करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्य असून या विचाराचे रक्षण करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. मा. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पिकरबाबत जे निर्देश दिले आहेत त्याचे पालन प्रशासन करेल. कायद्याच्या पुढे जाऊन कोणी भूमिका घेत असेल तर ती महाराष्ट्रात चालणार नाही. हा विषय राज ठाकरे या व्यक्तीपुरता मर्यादित नाही. कायदा तोडणारा कोणीही असो त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी काँग्रेसने या विषयांवर चर्चा केली आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याबाबत सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.

भाजपा ( BJP ) राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे. यातून महाराष्ट्राची बदनामी होत असून त्याचा परिणाम गुंतणूक व रोजगार निर्मितीवर होत आहे. परिणामी तरुणांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होत आहे हे सर्व थांबले पाहिजे. महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. बाहेरच्या राज्यातून तलवारी व इतर शस्त्र आणण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने उघड झाला आहे. धार्मिक विवाद करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे परंतु प्रशासन सतर्क आहे असून शासन व प्रशासन दोघेही राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न हाणून पाडतील असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.