शिंदे गटातील ‘या’ तीन मंत्र्यांच्या नावाला होता भाजपचा विरोध ? 

मुंबई – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

दरम्यान, दीपक केसरकर (Deepak Kesarkar), अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला भाजपने विरोध केला होता, असं समजतं. पण एकनाथ शिंदे यांनी ठाम भूमिका घेतल्याने या तिघांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा मार्ग मोकळा झाला.एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

दीपक केसरकर यांची शिंदे आणि ठाकरे गटातील दुरावा कमी करणारी वक्तव्यं आणि राणेंबरोबरचा वाद यामुळे भाजप त्यांच्या नावाला अनुकूल नव्हतं. तर अब्दुल सत्तार यांची वादग्रस्त वक्तव्यं आणि टीईटी घोटाळ्यात आलेलं नाव यामुळे भाजपने त्यांच्या नावाला विरोध केला होता असं कळतं. याशिवाय ज्यांच्यावर आरोप केले त्या संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्यासही भाजपकडून विरोध होता असं कळतं. पण आमचे मंत्री आम्हाला ठरवू द्या अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याने या तिघांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा मार्ग मोकळा झाला.