मध्य प्रदेशात 3 केंद्रीय मंत्र्यांसह 7 खासदारांना तिकीट देऊन भाजपने दिला मोठा संदेश

Madhya Pradesh Election: भाजपने (BJP) मध्य प्रदेशातील 39 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने दुसऱ्या यादीत तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदारांना उमेदवारी दिली आहे. भाजपने ज्या खासदारांना तिकीट दिले आहे ते सर्व खासदार मध्य प्रदेशातील विविध प्रादेशिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. अशाप्रकारे भाजपने यावेळी स्पष्ट संकेत दिले आहेत की पक्ष सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक भागातून मोठा चेहरा उतरवत आहे.

भाजपने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांना ग्वाल्हेर चंबळ प्रदेशातून उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल (Pralhad Patel) यांना बुंदेलखंडमधून विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. विंध्याचल प्रदेशाबद्दल बोलायचे झाले तर सतना मतदारसंघातून खासदार गणेश सिंह आणि सिधी विधानसभा मतदारसंघातून खासदार रीती पाठक यांना तिकीट देण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील महाकौशल भागातील लोकसभेतील मुख्य व्हीप आणि खासदार राकेश सिंह यांना जबलपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. निमाड मतदारसंघातून खासदार उदय प्रताप सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. त्याचबरोबर खासदार आणि केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते हे आदिवासी चेहरा म्हणून विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. याशिवाय बड्या चेहऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर भाजपचे माळवा भागातील राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना इंदूरमधून विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे.

ही यादी आणि उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा यांनी परिश्रम घेतल्याचेही राजकीय वर्तुळात मानले जात आहे. त्यांच्या सल्ल्यानेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री आणि खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. आगामी यादीत प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा स्वतः विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असेही मानले जात आहे.मध्य प्रदेशातील गटबाजी संपवण्यासाठी आणि प्रत्येक विभागातून मोठे चेहरे उतरवून भाजपला निवडणुकीत फायदा होईल, या विश्वासाने केंद्रीय नेतृत्वाने या बड्या चेहऱ्यांना तिकीट दिल्याचे मानले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला