भाजपाची ‘बी’ टीम एमआयएमने काँग्रेसबद्दल बोलू नये! अतुल लोंढे

खा. इम्तियाज जलील स्वल्पविरामाएवढ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष

मुंबई  : काँग्रेस ( Congress ) संपलेला पक्ष आहे अशा वल्गना करणारे नेते व पक्ष यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसला संपवणारे संपले पण काँग्रेस संपलेली नाही आणि संपणारही नाही. एमआयएम ही भारतीय जनता पक्षाची बी टीम ( MIM is the B team of the Bharatiya Janata Party ) असल्याचे सर्वज्ञात आहे त्यामुळे एमआयएमने काँग्रेसची चिंता करू नये स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ( Chief Spokesperson Atul Londhe ) यांनी लगावला आहे.

काँग्रेस पक्ष संपलेला आहे हा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल ( MP Imtiaz Jalil ) यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना अतुल लोंढे म्हणाले की, देशात धार्मिक मुद्द्यांच्या आधारे तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजणाऱ्या पक्षामध्ये एमआयएमचाही समावेश आहे. एमआयएम ही भारतीय जनता पक्षाला पूरक अशीच भूमिका घेत आलेला पक्ष आहे. भाजपाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या व स्वल्पविरामाएवढे अस्तित्व असलेल्या पक्षाने काँग्रेस पक्षाबद्दल बोलू नये. काँग्रेस हा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून काँग्रेसच सक्षम पर्याय देऊ शकतो. मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता पण त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. पाच वर्षात इम्तियाज जलील यांच्या पक्षाने फडणवीस सरकारला मुस्लीम आरक्षणावर प्रश्न विचारण्याचे धाडसही केले नाही.

देशात सध्या भाजपाचे सरकार संविधान व लोकशाही धाब्यावर बसवून काम करत आहे. संवैधानिक संस्था धोक्यात आल्या आहेत. देशात महागाई, बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. सर्वसामान्य जनता त्रस्त आहे त्यांचे प्रश्न घेऊन लोकशाही व संविधान वाचवण्याच्या लढ्यात काँग्रेस पक्ष नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. एमआयएम या लढ्यात कुठेच दिसत नाही. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे, काँग्रेसची चिंता करू नये, असे अतुल लोंढे म्हणाले.