महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये धडाडणार राज ठाकरेंची तोफ, सभेसाठी जय्यत तयारी

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये ( Raj Thackeray Aurangabad Rally ) सभा घेणार आहेत. या सभेत ते नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असून बेकायदेशीररित्या मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा ( Mosque Loudspeakers ) राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. या पार्श्वभूमीवर आज नेमकी राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे राज्यातील जनतेसह सत्ताधारी लक्ष ठेवून आहेत.

या सभेसाठी मनसेचे मराठवाड्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेत दाखल होत आहेत. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता त्याच मैदानावर राज ठाकरे यांची सभा होतेय.

राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवलाय. तसंच ते भोंगे उतरवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे आता राज ठाकरे आज कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरी तोफ कुणावर धडाडणार याची उत्सुकता लागलीय.