कॉंग्रेसमधून निलंबित असलेल्या आशिष देशमुखांना भाजपची सावनेरमधून उमेदवारी?

Nagpur News : विदर्भात कॉंग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची चिन्हे आता स्पष्ट दिसू लागली आहेत. कारण काँग्रेसमधून निलंबित असलेल्या आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.

एक तास चाललेल्या या भेटीनंतर फडणवीस आणि बावनकुळे काहीही बोलले नसले तरी आशिष देशमुख यांनी ही सदिच्छा भेट होती, फडणवीस हे विदर्भाचा विकास घडवणारे एकमेव नेते आहेत आणि पक्ष विरहित संस्कृतीच्या नात्याने ते माझ्याकडे आले होते अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार,  भाजपचा नागपूरलगतच्या सावनेर विधानसभा मतदार संघावर डोळा आहे. त्यामुळे देशमुखांना गाठीशी बांधून फडणवीस ही जागा आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत आहेत. भाजप येथून देशमुखांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. सध्या ही जागा काँग्रेसच्या सुनील केदार यांच्या ताब्यात आहेत. स्वतः देशमुखांचाही या मतदार संघावर डोळा आहे.

सावनेर हा आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख यांचा मतदार संघ होता. पण 1996 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून सुनील केदार यांनीच रणजित देशमुखांचा पराभव केला होता. यामुळे देशमुखांवरील या मतदार संघावरील वर्चस्व संपुष्टात आले होते. आता आशिष देशमुख भाजपच्या पाठिंब्याने पुन्हा हा मतदार संघ आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत आहेत.