शिवसेनेत लढाई लावून रक्तपात करण्याचा भाजपाचा डाव आहे; संजय राऊत यांचा गंभीर आरोप 

मुंबई – राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेतून बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपशी युती करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेतील बंडाचे धक्के अजूनही पक्षाला बसत असताना विरोधक देखील शिवेनेवर रोज निशाणा साधताना दिसत आहेत. तर बंडखोर आमदार (MLA) आणखी काही आमदार आणि खासदार सोबत येतील असा दावा करत आहेत.

या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचे तीन तुकडे पाडण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेविरुद्ध शिवसेना (Shiv Sena)अशी लढाई लावून रक्तपात करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला. सोबतच आमदारांच्या अपात्रतेची याचिका न्यायालयात प्रलंबित असतानाही बहुमताचा ठराव घेतला हे बेकायदेशीर आहे असं देखील ते म्हणाले.

मुंबई स्वतंत्र करून महाराष्ट्राचे तीन तुकडे पाडण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपाला (BJP)शिवसेना फोडायचीच नाही तर संपवायची आहे. त्यासाठी शिवसैनिकांमध्ये फूट पाडायची, एकमेकांवर हल्ले करायला लावून रक्तपात घडवायचा, हे धोरण दिल्लीच्या पाठिंब्याने भाजपाचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष हे एकेकाळचे शिवसैनिकच होते. आम्हाला शिवसैनिकांचा रक्तपात होऊ द्यायचा नाही, आमच्या लोकांचं रक्त सांडवायचं नाही. भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मार्ग काढू, असेही संजय राऊत म्हणाले.