‘या’ मराठी कलाकारांच्या प्रेमापोटी बोमन इराणी पत्नीसह सत्यनारायणाच्या पूजेला बसले होते

भावना संचेती/Mumbai – काही नाती ही रक्ता पलिकडची असतात कारण ती नाती मनाने आणि प्रेमाने जोडलेली असतात. आणि त्या नात्यासाठी माणूस अगदी काही गोष्टी सहज करून जातो पण त्या गोष्टी खूप काही देऊन जातात. बोमन इराणी (Boman Irani)हिंदी चित्रपट विश्वातील एक नावाजलेलं नाव. पण बोमन इराणी यांचे मराठी मातीशी आणि येथील कलाकारांशी एक वेगळेचं नातं आहे.

बोमन इराणी यांनी एका टॉक शो (Talk Show)दरम्यान अशाच काही जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे. बोमन इराणी आणि प्रसिद्ध मराठी कलाकार सुधीर जोशी (Sudhir Joshi)यांची घट्ट मैत्री होती. सुधीर जोशी यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. अशी ही बनवाबनवी , बाळाचे बाप ब्रम्हचारी , भुताचा भाऊ अशा अनेक गाजलेल्या मराठी सिनेमात (Marathi Cinema)काम केले आहे. अशी ही बनवाबनवी मधील घरमालकांची भूमिका अजून देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

बोमन इराणी सुधीर जोशी यांच्या बद्दल सांगताना म्हणतात की सुधीर यांच्यासोबत काम करणे म्हणजे एका कला महाविद्यालयात (University) काम करण्यासारखे होते. मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळाले. सुधीर जोशीनी मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. त्याच्यामुळे मला मराठी रंगभूमीची (Marathi theatre) एक वेगळीचं ओळख झाली. आमची दोघांची विचार करण्याची क्षमता एक सारखीच होती. त्यामुळे आमच्या दोघांचे फार जमायचे. त्याच्यातील सर्वात चांगला गुण म्हणजे जर एखाद्या कलाकारांनी चांगला अभिनय (Acting) केला तर ते त्या कलाकाराला भरभरून दाद देत.

‘आय एम नॉट बाजीराव’ (I am Not Bajirao) या नाटकाच्या वेळेस सुधीर जोशी विंगेत आले आणि त्यांनी आमच्या टीम ला सलाम केला. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी दाद आहे. हे सांगायला देखील बोमन इराणी विसरले नाहीत. मला त्याच्या डोक्यात काय चालू आहे हे नेमके समजायचे. त्यांना देखील माझ्या मनात काय सुरू आहे यांचा पूर्ण अंदाज येत. त्यामुळे आमचं नातं हे शब्दा पालिकडचं होतं. सुधीर जोशी यांचं माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर खूप प्रेम होतं. ते मला त्याच्या मुलाप्रमाणे मानत.

एकदा त्याच्या घरी सत्यनारायनाची पूजा होती. त्यांना एक विवाहित जोडपं हवं होतं. त्यांना मुलं -बाळं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या घरच्या पूजेस बसण्याचा मान दिला. मी आणि माझी पत्नी झेनोबिया अगदी आनंदाने त्या पूजेस बसलो. त्यावेळेस मला जो आनंद झाला होता तो शब्दात मांडता येणार नाही असा आहे. माझी पत्नी देखील प्रचंड आनंदी झाली होती. त्यावेळेस जे आम्हाला समाधान मिळाले ते शब्दात व्यक्त करता येणार नाही असं आहे. आम्ही त्यावेळेस अगदी महाराष्ट्रीयन लुकमध्ये त्या पूजेस बसलो होतो. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला त्याच्या घरातील व्यक्तीचा दर्जा देतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या घरचे झालेलो असतो. जेव्हा बोमन इराणी यांनी सुधीर जोशी यांचे इतके कौतुक केले तेव्हा प्रेक्षकांनी देखील त्यांना भरभरून दाद दिली. एक कलाकार जेव्हा दुसऱ्या कलाकाराचा मोठेपणा दाखवतो तेव्हा तो कलाकार स्वतः मोठा असतो.