आता मात्र अती झालं, आता ते शिवसेना प्रमुख व्हायला निघाले आहेत – ठाकरे 

मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ (Bow & Arrow) हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला. तसेच, या दोन्ही गटांना ‘शिवसेना’ (Shivsena) हे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी ठाकरे यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

ते म्हणाले, “आपल्याशी काही जणांनी गद्दारी केली. मुख्यमंत्रीपद ज्यांना पाहिजे होते, त्यांनी ते घेतले. ज्यांना सर्वकाही दिले, तेही गेले. आपण काय बोललो नाही. मात्र, आता मात्र अति होत आहे. शिवसेना प्रमुख व्हायला निघाले आहेत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

“शिंदे गटाचा हेतू हा शिवसेनेला संपवण्याचा आहे, पण मी कुठेही डगमगलो नाही. कारण माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. काही कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व गोठवलं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर (Shinde Group) केला आहे. निष्ठा ही विकत घेता येत नाही हे परवाच्या मेळाव्यावरुन स्पष्ट झालं असंही ते म्हणाले.