चाकणकरांना दोन वेळा फोन केला, पण त्यांनी तो उचलला नाही; सुषमा अंधारे यांचा आरोप

मुंबई : राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या विरोधात अर्वाच्य भाषा वापरली तरी राज्य महिला आयोगाकडून त्यावर कारवाई करण्यात आली नाही, रुपाली चाकणकरांना आपण या संदर्भात दोन वेळा फोन केला पण त्यांनी तो उचलला नाही असा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे.

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी महिला आयोगावर टिका करत नाही, तर महिला आयोगाच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छिते की त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई करावी. मी रुपाली चाकणकर यांना दोनवेळा गुलाब पाटील यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात फोन केला, पण चाकणकर यानी फोन उचलला नाही.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, माझा महिला आयोगालाही सवाल आहे की जर अब्दुल सत्तार यांना तुम्ही आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नोटीस बजावता तर गुलाब पाटील यांना नोटीस का बजावत नाही. दोघेही गुन्हेगारच आहेत. राज्य महिला आयोगाने सिलेक्टिव्ह वागू नये. फक्त अब्दुल सत्तार यांना नोटीसा काढू नये.