‘राज ठाकरेंचे समर्थन करणाऱ्या प्राजक्तावर कारवाई करा; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून काढून टाका’

मुंबई – मशिदीवरील भोंगे (Loudspeker) उतरवण्यासाठी मनसे आग्रही आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेली मुदत आज संपणार आहे.  3 मे पर्यंत भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम (Ultimatum) दिला होता.  मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास कोणाचेही एकूण घेणार नाही. मशिदींसोमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanumaan Chalisa) पठण करू, असा इशारा दिला आहे. राज्यातील राजकारण यामुळे तापले आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Actress Prajakta Mali) इन्स्टाग्राम अकाऊंटवरून  एक पोस्ट शेअर केली  होती जी आता एडीट केली आहे. मात्र सुरुवातीच्या पोस्टमध्ये  प्राजक्ताने सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या (Akshayya Tritiya) आणि ईदच्या  (Eid) शुभेच्छा देत १ मे रोजी राज ठाकरेंनी दिलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच तिने वर्तमानपत्रात असलेल्या एका लेखाचा फोटो शेअर केला आहे. या लेखात मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत.

ही पोस्ट शेअर करत प्राजक्ता म्हणाली, “सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. (आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय.)”  पुढे प्राजक्ता म्हणाली, “असो…आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक. धन्यवाद… मा. श्री. राज ठाकरे (Raj Thackeray) सगळ्याचसाठी…परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून; ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटत..? खूप धन्यवाद”, असे कॅप्शन तिने दिले आहे.

दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी (Sachin Kharat) आता राज्य सरकारने प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सचिन खरात यांनी म्हटले आहे, राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणाचे समर्थन केल्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची पोस्ट तपासून राज्य सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातूनदेखील त्यांना काढण्यात यावे.

सचिन खरात यांनी पुढे म्हटले आहे, राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये चिथावणीखोर भाषण केले. तरीदेखील प्राजक्ता माळी यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचं समर्थन केलं आहे. प्राजक्ता माळी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षण घेतलं व आज लोकप्रिय कलाकार झाला आहात. असं ते म्हणाले.