वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी – मुख्यमंत्री

मुंबई : – वीज तुटवड्याची ( Power outage ) स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत ( Power saving ) करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी आज येथे दिले. याशिवाय महानिर्मितीने राज्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध व्हावी यासाठी खासगी वीज कंपन्या तसेच अन्य पर्यायी मार्गांबाबतचे काटेकोर नियोजन करावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. खासगी वीज कंपन्यांना अतिरिक्त वीज निर्मिती ( Power generation ) करावी. त्यासाठीच्या लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वीज बचतीबाबत ग्रामपंचायत ( Gram Panchayat ) , नगरपालिका ( Municipality ) ते महापालिकास्तरांपर्यंत जागरूकता निर्माण होण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

वर्षा येथील समिती सभागृहात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वीजनिर्मितीच्या नियोजनाबाबत आज उर्जा विभागाची बैठक झाली. बैठकीस ऊर्जार्मंत्री डॉ. नितीन राऊत ( Energy Minister Dr. Nitin Raut ), खासदार अनिल देसाई ( MP Anil Desai ), खासदार विनायक राऊत ( MP Vinayak Raut ), मुख्यसचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, राज्याची विजेची निकड पूर्ण व्हावी यासाठी सर्व ते पर्यायांची पडताळणी करण्यात यावी. वीज गळतीच्या बाबतीत बेजबाबदारपणा चालणार नाही. त्याकडे दुर्लक्ष करू नका. वीजेचे संकट हे केवळ आपल्या राज्यातच नाही तर ते देशातील अन्य राज्यांतही आहे. त्यामुळे अन्य राज्ये करत असलेल्या उपाययोजना, वीज देवाण-घेवाण याबाबत माहिती घेण्यात यावी. वीज बचतीबाबत राज्यातील ग्रामपंचायतींपासून ते सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क करावे. सार्वजनिक ठिकाणच्या वीज वापराबाबत उधळपट्टी ( Waste ) होणार नाही, याबाबत जागरूक राहण्याचे निर्देश देण्यात यावेत. यासाठी ग्रामविकास, नगरविकास आणि ऊर्जा विभागाने संयुक्तपणे प्रयत्न करावेत.