चंद्रकांतदादा पाटील यांची‌ सरपंचांसोबत ‘लंच पे चर्चा’; गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सूचना

Pune – पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी  आपल्या नियोजित कार्यक्रमानंतर लंच पे चर्चा’च्या माध्यमातून सरपंचांशी संवाद साधला. गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सूचना यावेळी त्यांनी सर्वांना केली.पुणे जिल्हा परिषेदेने आयोजित केलेल्या जलजीवन मिशन कार्यशाळेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थिती लावली. या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जलजीवन मिशन (Jaljeevan Mission)  मुळे ग्रामीण भागाचे चित्र पालटणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिली.

या कार्यक्रमानंतर पालकमंत्री पुढील कार्यक्रमास निघणार होते. जेवणाचीही वेळ झाली असल्याने तसेच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसोबत थेट संवाद साधण्याची संधी असल्याने त्यांच्यासोबतच भोजन करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. त्यांनी काही महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

जलजीवन मिशन ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याची भावना यावेळी महिला सरपंचांनी व्यक्त केली. ग्रामीण भागाचा विकास ही आपली प्राथमिकता आहे. गावच्या विकासासाठी मी नेहमीच कटीबद्ध आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सर्वांना समान निधी उपलब्ध करून दिला आहे. आपणही सर्वांना सोबत घेऊन काम करावा, अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली.