‘नाना पटोले यांनाच लम्पी आजार झाला आहे,त्यांनाच चांगल्या डॉक्टरांकडे पाठवण्याची गरज आहे’

Nana Patole on Lumpy Virus : गायवर्गीय पशूंना ‘लम्पी स्किन डिसीज’ (Lumpy skin disease) या साथीच्या रोगाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या आजाराची साथ परसली आहे. तसेच, यावरती उपाय रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे रोगाचा संसर्ग होण्याचा वेग कमी आला आहे. त्यात आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लम्पी रोगाबाबत अजबच दावा केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले,” असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान,पटोलेंच्या या विधानानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाना पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे.  मागच्या दोन-चार महिन्यांमध्ये नाना पटोले ज्याप्रमाणे बोलत आहेत. त्यावरून असं दिसतं की, नाना पटोले यांनाच लम्पी आजार झाला आहे. त्यांनाच चांगल्या डॉक्टरांकडे पाठवण्याची गरज आहे. त्यांचा आजार तपासून घेण्याची गरज आहे” अशा शब्दांत बावनकुळेंनी टीकास्र सोडलं आहे.